सांगोला : तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या मालमत्ताधारकांकडे असलेली घरपट्टी, वीज व आरोग्य कराची सात कोटी सात लाख दोन हजार ६८७ रुपये वसुली थकली आहे. सामान्य विशेष पाणीपट्टीची सहा कोटी ७६ लाख ३७ हजार १४० रुपये थकले आहेत. अशा प्रकारे एकूण १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपयांच्या थकबाकीपैकी चार कोटी ५८ लाख ५९ हजार २५३ रुपयांचा कर वसूल झाला आहे. उर्वरित कराची वसुली मोहीम सुरू आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा आत्मविश्वास गटविकास अधिकारी संतोष राऊत व्यक्त केला.
सांगोला पंचायत समितीअंतर्गत तालुक्यात ७६ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. घेरडी, जवळा, कडलास , सोनंद, हातीद, जुनोनी, कोळे चोपडी, नाझरे, वाटंबरे, वाढेगाव, महूद अशा मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टीच्या कर रूपाने मोठा महसूल जमा होतो.
---
१३ कोटी ८३ लाखांचे उद्दिष्ट
ग्रामपंचायतीकडून दरवर्षी ३१ मार्चअखेर घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्टे घेऊन मालमत्ताधारकांकडून कर वसूल केला जातो. त्यावरच ग्रामपंचायतीचे वर्षभर अर्थकारण चालते. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीची घरपट्टी सुमारे सात कोटी सात लाख दोन हजार ७८७ रुपये, तर पाणीपट्टी सहा कोटी ७६ लाख ३७ हजार १४० रुपये असे एकूण १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.
---
दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंत ७६ ग्रामपंचायतींकडून घरपट्टीपाेटी दोन कोटी २४ लाख ८१ हजार ८५४४ रुपये, तर पाणीपट्टीपोटी दोन कोटी ३३ लाख ७७ हजार ३९९ रुपये असे एकूण चार कोटी ५८ लाख ५९ हजार २५३ रुपये वसूल करण्यात आले आहेत.
---
निवडक दाखल्यांमुळे उत्पन्नावर परिणाम
ग्रामपंचायतीला पूर्वी विविध प्रकारच्या दाखल्यातून मोठे उत्पन्न मिळत होते. परंतु फेब्रुवारी २०१९च्या शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीकडे निवडक दाखले देण्याचे अधिकार राहिल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीला जन्म-मृत्यू, विवाह, घर जागेचा उतारा, दारिद्र्यरेषेचा दाखला, विधवा परितक्ता असे दाखले देण्याचा अधिकार राहिला आहे.