सोलापूर : नियोजित मुंबई-हैदराबाद बुलेट (हायस्पीड) ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जाणार आहे. या सहा तालुक्यांतील ७८४ एकर जमीन भूसंपादित होणार असून, ग्रामीणसाठी मूल्यांकनापेक्षा पाच पट जास्त, तर शहरासाठी अडीच पट जास्त मोबदला मिळणार असल्याची माहिती जनसुनावणीदरम्यान देण्यात आली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरण आणि सामाजिक दृष्टीने सार्वजनिक सल्लामसलतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, भूसंपादन अधिकारी अरुणा गायकवाड, प्रांताधिकारी हेमंत निकम, आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून संंबंधित हायस्पीड बुलेट ट्रेनसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. प्रास्ताविक अपर्णा कांबळे यांनी केले. त्यानंतर पीपीटीद्वारे बुलेट ट्रेनसंदर्भातील सर्व माहिती, जमीन भूसंपादन, कालावधी, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
----------
पॉइंटर्स...
- मुंबई-हैदराबाद मार्ग - ६४९ किलोमीटर
- स्थानके - सोलापूर अन् पंढरपूर
- ट्रेनची क्षमता - ७५० प्रवासी
- कोच असणार - १० बाय १०
- नियोजित स्पीड - ताशी ३०० किलोमीटर
---------
ही असणार स्थानके...
नियोजित मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या ६४० किलोमीटरच्या मार्गावर नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद, हैदराबाद हे स्थानके असणार आहेत.
---------
पुणे, सोलापुरातील सर्वाधिक जमीन
हायस्पीड ट्रेनच्या नव्या मार्गासाठी १७.५ मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सर्वाधिक जमीन ही पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील बाधित होणार असून, शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नसल्याचे सांगण्यात आले. कर्नाटकातील एका जिल्ह्यातील जमिनीचे भूसंपादन होणार आहे.
------------
अंतिम आराखड्यासाठी वर्ष लागणार
नव्या मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनसंदर्भात मार्ग, स्थानके, सामाजिक व लिडारद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, आता प्रत्यक्ष काम कसं होईल? कसा मार्ग असेल? किती जमीन बाधित होईल? यासह अन्य माहितीसाठी अंतिम लिडारद्वारे सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
---------
सोलापूर ते मुंबई होणार तीन तासांचा प्रवास
ताशी ३०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या हायस्पीड ट्रेनने सोलापुरातील प्रवासी मुंबईत तीन तासांत पोहोचणार आहे. सध्या सोलापूर-मुंबई हा एक्स्प्रेसचा प्रवास आठ तासांचा आहे. जलदगतीने प्रवास झाल्यास सोलापुरातील उद्योग क्षेत्राचा विस्तार होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई-हैदराबाद हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्प प्राथमिक स्तरावरून समजावून घेतला. अंतिम अहवाल लवकरच तयार होईल. हे काम लवकरात लवकर होण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहे. सोलापूरच्या विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहे.
- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर लोकसभा मतदारसंघ