सोलापूर : पुण्यात पाच वर्षांपूर्वी मॉब लिचिंगचा बळी ठरलेल्या सोलापूरच्या मोहसीन शेखला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर मोहसीन’ हा ट्रेंड चालवण्यात आला. जगभरातून एक लाख २० हजारांहून अधिक लोकांनी टिष्ट्वट, पोस्ट करुन न्यायाची मागणी केली.
मोहसीन शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सोलापूर आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते गेल्या चार वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. सोशल मीडियावरील ट्रेंडबाबत सामाजिक कार्यकर्ते अॅड. मेहबूब कोथिंबीरे म्हणाले, मोहसीन हा सोलापूरच्या विकास नगरात राहायला होता. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाºया या तरुणाची समाजकंटकांनी २ जून २०१४ रोजी खून केला होता. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याला अटक झाली. देसाईला जामिनावर सोडण्यात आले आहे.
मोहसीन हा मॉब लिचिंगचा बळी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. निकम यांनी वकीलपत्र मागे घेतले. त्यानंतर कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही. न्यायालयात खेटे मारुन मोहसीनच्या वडिलांना नैराश्य आले. त्यातच त्यांचे निधन झाले. मोहसीनच्या आईला ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५० लाख रुपयांची मदत जाहीर झाली होती. प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळाली आहे. मोहसीनच्या खुनाला मंगळवार, २ जून रोजी सहा वर्षे पूर्ण झाली.
लंडन, अमेरिकेतून झाले टिष्ट्वट- फेसबुक आणि टिष्ट्वटर जस्टीस फॉर मोहसीन हा ट्रेंड चालवण्यात आला. लंडन, अमेरिकेसह आपल्या देशातील विविध शहरांतून लोकांनी हा ट्रेंड चालवला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, राजकीय नेत्यांचा समावेश होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक लोकांनी टिष्ट्वट केले होते. महाआघाडी सरकारने मोहसीन आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, असे अॅड. कोथिंबीरे यांनी सांगितले.