सोलापूर : दोघा ऊसतोड मुकादमांकडून ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून दोघा ऊस वाहतूकदारांची मिळून सुमारे ८ लाख ३२ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दोघा ऊस वाहतूकदारांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली असून योगेश शेनपडू महाले (रा. कुंझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) व शंकर गोविंद भिल (रा. वार कुंडाना, ता. धुळे) या दोघा ऊसतोड मुकादमांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पहिल्या घटनेतील ऊस वाहतूकदार फिर्यादी संतोष सूर्यभान खारे (रा. महिंसगाव, ता. माढा) यांनी सन २०२१-२२ साठी ऊसतोड मजुरांकरिता मुकादम शंकर गोविंद भिल बरोबर करार करून १२ कोयती (२४ मजूर) यांच्यासाठी ४ लाख ४० हजार रुपयांचा करार केला. त्यापैकी १३ डिसेंबर २०२१ रोजी २ लाख २० हजार रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतर ऊस वाहतूकदार खारे हे मुकादम शंकर भिल यांच्या गावी मजूर आणण्याकरिता वार कुंडाना येथे वाहनासह गेले असता मुकादम भिल यांनी ऊसतोड मजूर न पुरवता ‘तुला काय करायचे ते कर जा... असे म्हणत पुन्हा आलास तर जिवे मारून टाकीन,’ अशी धमकी देत सुमारे २ लाख २० हजार रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेतील ऊस वाहतूकदार फिर्यादी अनिल अर्जुन दास (रा. रोपळे क, ता. माढा) यांनी सन २०२२ -२३ ऊस हंगामासाठी ऊसतोड मजूर मुकादम योगेश शेनपडू महाले याच्याशी करार करून ८ कोयती (१६ मजूर) करिता करार करून १२ जुलै २०२२ रोजा ४ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. १२ जुलै ते २३ जुलै २०२२ दरम्यान फिर्यादीचे मेहुणे ओंकार छगन अवताडे (रा. बारलोणी) यांच्या फोन पे वरून योगेश शेनपडू महाले यास ३ लाख ३९ हजार रुपये कोयते (ऊसतोड मजूर) वाढवून देतो म्हणून पाठवले. २० आक्टोबर २०२२ रोजी महाले यांच्या गावी वाहन घेऊन फिर्यादी ऊसतोड मजूर आणण्याकरिता गेला असता त्यावेळी मुकादम महाले याने ५ कोयती देऊन बाकी राहिलेले कोयती व मजूर मागावून पाठवून देतो म्हणला. त्यावेळी फिर्यादीने मुकादम महाले यास ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर वारंवार फोन करूनही मुकादम महाले याने मजूर पाठवले नाहीत. ५ कोयती (१० मजूर) यांनी दीड महिना ऊसतोड केली व १ लाख ७६ हजार ८०० रुपये फेडले. ऊसतोड मुकादम याने राहिलेले ६ लाख १२ हजार २०० रुपये परत न देता फसवले.