श्रीपूर : अकलूजमधून दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून अकलूज पोलिसांनी ८४, २८८ रुपयांची दारू आणि एक कार जप्त केली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांना अकलूज-टेंभुर्णी मार्गावरून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. जुने एस.टी. स्टँड चौकात पोलिसांनी सापळा लावून एक कार अडवली.
सदाशिव अजय मराठे (वय २५ वर्षे, रा. निमगांव टें. ता. माढा) हा एका कारमधून नंबर (एम. एच. १४/एफ.सी. ००३६) देशी-विदेशी दारूच्या १४४० बाटल्या घेऊन जाताना सापडला, याबाबत पोलीस नाईक नितीन लोखंडे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक विलास माने करीत आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत सहायक फौजदार बाळासाहेब पानसरे, हवालदार रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, मंगेश पवार, विक्रम घाटगे, पोलीस नाईक काशिद, नितीन लोखंडे यांनी सहभाग नोंदवला.