पंढरपूर : राज्यात १० मे रोजी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची एमएचटी- सीईटी परीक्षा होणार आहे़ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटीची सराव सीईटी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातून ८५० विद्यार्थ्यांनी दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस़ के़ एन. सिंहगड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयात १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सराव परीक्षा घेतली. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांवर परीक्षा झाली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेविषयी असलेली भीती कमी होणार आहे. या सराव परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत होईल. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना तत्काळ देण्यात आला. ही परीक्षा विनामूल्य घेण्यात आली होती.
या सीईटी सराव परीक्षेतून फिजिक्स, केमिस्ट्री या विषयातून दोन प्रथम क्रमांक तर मॅथेमॅटिक्स या विषयातून पहिले दोन क्रमांक काढले़ त्यात अनुक्रमे प्रशांत जालगिरे, राणी जाधव, धवल ताटे, सोनिया कागदे यांचा समावेश आहे़ त्यांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. श्याम कुलकर्णी, प्रा. सुभाष पिंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले़ सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना येण्यासाठी-जाण्यासाठी मोफत बस उपलब्ध करून देऊन परीक्षार्थींना भोजन देण्यात आले.