आप्पासाहेब पाटील
सोलापूर: अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात सर्व संघटनांनी एकत्र येऊन ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून ७२ तासाच्या संपावर जाणार असल्याची माहिती एम.एस.ई. बी. वर्कर्स फेडरेशनचे विलास कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे, भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, पनवेल,तळोजा व उरण परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यास वीज ग्राहक लोकप्रतिनिधी व वीज कामगार संघटना सर्वत्र विरोध करीत असून त्याविरोधात कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रभर द्वार सभा घेवून राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात निषेध केला आहे.
राज्य सरकारने वेळोवेळी कोटयावधी रूपये खर्च करून लाखो ग्राहकांना वीज पुरवठा देण्यासाठी हजारो रोहित्र, लाखो पोल शेकडो हजारो उपकेंद्रे उभी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला २४ तास अखंडित वीज पुरवठयाचा लाभ मिळत आहे, असे असूनही अलीकडे अदानी इलेक्ट्रिक कंपनीने राज्यातील महसुलीदृष्टया अतिशय महत्वाच्या असलेल्या भांडुप परिमंडळांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. हा अशा प्रकारच्या देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये होत आहे. जर असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या वीज उदयोगावर त्याचे विपरीत परिणाम होतील.
सदरचे ग्राहक जर महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकास वीज दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो आणि महाराष्ट्रातील जनता भविष्यात वाढीव वीज दरामुळे वीज वापर करू शकणार नाही अशी परिस्थीती निर्माण होवू शकते. वीज ग्राहकांचे भविष्य अंधारात जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस एम.एस.ई. बी. वर्कर्स फेडरेशनचे विलास कोले, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे गौरेश पाटील, वीज कामगार महासंघाचे विजयकुमार राकले, तांत्रिक कामगार युनिअनचे नितीन चव्हाण, महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय विदयुत कर्मचारी संघटनेचे पी.एल. जाधव, इलेक्ट्रीसिटी लाईनस्टॉफ असोशिएशनचे गोपाळ बार्शीकर, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटक युवराज यलगुलवार, महाराष्ट्र राज्य विदयुत अधिकारी संघटनेचे निलेश वरखडे, राजेंद्र निकम,शशिकांत बनसोडे आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"