सांगोला : शासन नियमानुसार दरवर्षी आर्थिक बजेटच्या ५ टक्के निधी हा दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवण्याचा ठराव सांगोला नगर परिषदेमध्ये केला होता. त्यानुसार सन २०१७-१८मध्ये ३७ दिव्यांगांना प्रत्येकी ८ हजार रूपयांप्रमाणे एकूण २ लाख ९६ हजार रूपये, २०१८-१९मध्ये ३६ दिव्यांगाना प्रत्येकी ८ हजारप्रमाणे २ लाख ८८ हजार रूपये, २०१९-२०मध्ये ९ दिव्यांगांना प्रत्येकी ८ हजार रूपयांप्रमाणे ७२ हजार रूपये असे एकूण ८२ दिव्यांग लाभार्थ्यांना ६ लाख ५६ हजार रूपये निधी खर्च झाला आहे. त्याचबरोबर चालू वर्ष २०२०-२१मध्ये ५ लाभार्थ्यांना ३० हजार रूपयांप्रमाणे एकूण १ लाख ५० हजार रूपये निधीचे वाटप केल्याची माहिती नगराध्यक्ष राणी माने यांनी दिली.
अपंगांना वैद्यकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करणे व दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत ८७ लाभार्थ्यांची नोंद सांगोला नगर परिषदेकडे झाली आहे. या दिव्यांग लाभार्थ्यांचा बँक ऑफ इंडिया शाखा, सांगोला येथे ३५२ रूपयांचा आरोग्य विमा काढण्यात येणार असून, यासाठी ३० हजार ६२४ रूपये खर्चाला सभागृहाकडून मंजुरी दिली आहे. यासाठी सभा अधीक्षक शरद माने यांनी परिश्रम घेतले.