सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सोमवारी जाहीर केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या १३७ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. यासाठी ३१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात सुरू करण्यात येत असून, २३ जून रोजी मतदान घेण्यात येत आहे.
राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्य पदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे ते ६ जून या कालावधीत अर्ज तहसील कार्यालयात स्वीकारले जातील. २ व ५ जून या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १0 जूनपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.
मतदान २३ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल.अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून देण्यात आली.