सोलापूर : सोलापूर विद्यापीठातील अधिसभेच्या निवडणुकीसाठी ११ पैकी दोन अर्ज माघार घेण्यात आल्याने आता ४ जागांसाठी ९ जण रिंगणात उतरले आहेत. दि.१७ जुलै रोजी ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांच्या निवडीनंतर व्यवस्थापन परिषदेच्या निवडी होत असतात. मध्यंतरी या निवडीवर स्थगिती आली होती. शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या राखीव प्रवर्गातील ४ जागांवर प्राचार्य व्हीजेएनटीसाठी भारत महाविद्यालय जेऊरचे प्राचार्य बाळू शिंगाडे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय,मंद्रुपचे विद्यापीठ शिक्षक एस.टी.मधून प्रा. भगवान अधटराव, संस्था प्रतिनिधी अब्राहम आवळे, शाहू शिक्षण प्रसारक मंडळ आणि पदवीधर ओबीसीसाठी अॅड. नीता मंकणी हे बिनविरोध झाले आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी संस्था प्रतिनिधीसाठी प्राचार्य बी.पी. रोंगे आणि स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्राचार्य प्रतिनिधीसाठी डॉ. भीमाशंकर भांजे, प्राचार्य डॉ. संतोष कोटी आणि प्राचार्य डॉ. आर.आर. पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षक/विद्यापीठ शिक्षकासाठी प्रा. हनुमंत आवताडे, डॉ. अनिल बारबोले आणि डॉ. चंद्रकांत चव्हाण यांचे अर्ज दाखल झाले होते.
पदवीधर प्रतिनिधीसाठी विकास मंचच्या वतीने अश्विनी चव्हाण आणि पद्मावती नागणसुरे आणि सुटाचे सचिन गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले होते. या अर्जदारापैकी विद्यापीठ शिक्षकमधून डॉ. चंद्रकांत चव्हाण तर पदवीधरमधून पद्मावती नागणसुरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी ९ जणांचे अर्ज कायम राहिले असून १७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.दोघांची माघार- दि.६ जुलैपर्यंत खुल्या प्रवर्गासाठी ११ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. दि.१0 जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत होती. ११ अर्जांपैकी २ अर्ज माघार घेण्यात आले असून आता ४ जागांसाठी ९ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.