सोलापूर : आॅक्टोबर महिन्यात शहराच्या विविध भागात डेंग्यूचे ९६ तर स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचा दावाही महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केला आहे.
शहरात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते. यावरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळही झाला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहराच्या विविध भागात औषधाची फवारणी आणि धुराळणी करण्यात आली. शहरामध्ये जानेवारीपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.
आॅक्टोबरअखेर डेंग्यूचे ३३६ रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे ४० रुग्ण आढळून आले होते. यातील काही रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काहींवर उपचार सुरू असल्याचेही महापालिकेच्या आरोग्य विभाग अधिकाºयांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी आणि धुराळणीचे काम सुरू असल्याचेही डॉ. नवले यांनी सांगितले.