सोलापूर : नोटबंदीच्या काळात सोलापूर जनता सहकारी बँकेने, आयसीआयसीआय बँके मार्फत रिर्झव बँक आॅफ इंडियाकडे जमा केलेल्या ८३ कोटी पैकी ९ हजाराच्या ११ नोटा बनावट असल्याचे सांगुन कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणी शुक्रवारी अज्ञात इसमाविरूद्ध फौजदार चावडी पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ नोव्हेंबर २0१६ रोजी केंद्र शासनाने अचानक चलनातील ५00 व १000 रूपयाच्या नोटा बंद झाल्याचे जाहिर केले. अस्तित्वात असलेल्या नोटा बदलुन देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. शिंदे चौकातील मुख्यकार्यालय असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेने त्यांची करन्सी चेस्ट बँक आॅफ इंडिया बाळीवेस येथे पैसे भरण्यास गेले होते. मात्र त्यांनी असमर्थता दर्शविल्यामुळे रिर्झर्व्ह बँक आॅफ इंडिया करन्सी आॅफीस बेलापूर मुंबई ने आयसीआयसीआय सांगली करन्सी चेस्ट बँक यांना पैसे भरून घेण्यास आदेश दिला. २८ डिसेंबर २0१६ रोजी बाँड करून २९ डिसेंबर २0१६ रोजी ८३ कोटी आयसीआयसीआय बँकेत भरले.
आयसीआयसीआय बँकेने हे पैसे ८ आॅगस्ट २0१७ रोजी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया बेलापूर येथे जमा केले. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने तपासणी केली असता त्यातील ५00 रूपयाच्या ४ तर १000 रूपयाच्या ७ नोटा या बनावट असल्याचे आढळुन आले. २५ आॅक्टोंबर २0१७ रोजी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने बनावट नोटा दाखवुन सोलापूर जनता बँकेला संबंधित अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. या पत्रान्वये सोलापूर जनता बँकेचे सहाय्यक सर व्यवस्थापक विनायक फडके (वय-५७ रा. ११-बी, प्लॉट नं.२0 महावीर कॉलनी विजापूर रोड) यांनी शुक्रवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जमादार हे तपास करीत आहेत.