जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत आदेश पारित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या नागरिकाकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
यानुसार पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात विनामास्क प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून तलाठी व मंडल अधिकारी यांनी ५ हजार रुपये दंड वसूल केलेला आहे.
तसेच तहसीलदार बेल्हेकर व गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी भंडीशेगाव, उपरी, गादेगाव या गावामध्ये अचानक भेट देऊन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. असा एकूण १९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई तहसीलदार सुशील बेल्हेकर, निवासी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, महसूल नायब तहसीलदार पंडित कोळी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.