भीमानगर : पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमधून सोमवारी ९ हजार ४० क्युसेक पाण्याची आवक झाली. मंगळवारी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. अवघ्या तीन दिवसात उजनी धरणाचा पाणीसाठा चार टक्क्यांनी वाढला आहे. चालू पावसाळी हंगामातील ही पहिलीच आवक आहे.
यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आवक सुरू आहे. उजनी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
भीमा खोऱ्यात मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. सध्या उजनी पाणलोट क्षेत्रातील धरण साखळीतील धरण परिसरात चांगला पाऊस नोंदला आहे. मागील २४ तासात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात २६९ मिमी पावसाची नोंद आहे.
दरम्यान उजनीत आवक झाल्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे धरण लाभक्षेत्रात भुईमुगाची काढणी करून अडसाली ऊस, केळी व कांदा लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
---
२० दिवसात आठ टक्के पाणी वाढले
दरम्यान २० जून रोजी सकाळी उजनी धरणाची स्थिती ही वजा १६.४९ टक्के होती, तर मंगळवारी सकाळी ४८ तासानंतर यात पाच टक्के भर पडल्याने ती वजा १२ टक्के अशी झाली आहे. जवळपास दोन टीएमसी पाणी धरणात आले आहे.
सध्या उजनी धरण मृत साठ्यात आहे. ते उपयुक्त पातळीत येण्यासाठी ७ टीएमसी पाण्याची गरज यासाठी भीमा खोऱ्यात आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. यंदा उजनी धरण उणे २२.४२ ते उणे १२ अशा स्थितीत आले असून जवळपास ८ टक्के पाण्याची वाढ मागील २० दिवसात झाली आहे.
---
उजनीतील पाणी पातळी
एकूण पाणी पातळी - ४८९.९०० मीटर
एकूण पाणीसाठा - ५६.९० टीएमसी
उपयुक्त साठा - उणे ६.७५ टीएमसी
टक्केवारी - उणे १२ टक्के आवक
दौंड विसर्ग - ५६०० क्युसेक
बंडगार्डन - नाही
---
२२ उजनी