भ. के. गव्हाणेबार्शी : येथील महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाºया बार्शी, माढा आणि करमाळा तालुक्यात फेब्रुवारी-२०१८ अखेर ९१३ कोटी ५३ लाखांची वीज बिले थकीत आहेत. त्यात कृषीपंपाची ८७१ कोटी १५ लाख, घरगुती आणि औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे ६ कोटी ७५ लाख तर पाणीपुरवठ्याची ११ कोटी ४२ लाख रुपयांचा समावेश आहे. थकीबाकीमध्ये इतर घटकांचाही समावेश आहे.
थकबाकी कमी कमी होण्यासाठी आजपर्यंत शासनाने व वीज वितरण कंपनीने कृषीपंप थकबाकीसाठी अनेक विविध सवलती जाहीर केल्या, सबसिडी जाहीर केली, परंतु त्यास अपेक्षेप्रमाणे ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी ठरविलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वसुली न होता उलट थकबाकी कमी होण्याऐवजी मागील वर्षापेक्षा जवळ जवळ २२२ कोटींची वाढ झालेली दिसत आहे.
सध्या महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, ती अधिक तीव्र करण्यात येत आहे. तरीही वीज बिल वसुलीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळेना. सध्या सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची संख्या विचारात घेता ती २ लाख ८६ हजार ६१२ इतकी आहे. त्यात बार्शी तालुक्यात घरगुती ५५००५, व्यापारी ४७९१, औद्योगिक १०९४ तर कृषी ग्राहक २७२४९ व इतर ४१५ असे एकूण १ लाख १२ हजार ९१६ तर करमाळा तालुक्यात घरगुती २५९५२, व्यापारी २५०२, औद्योगिक ग्राहक ५३७, कृषी ग्राहक ३२२११ इतर ४११ असे एकूण ७५८१६ आहेत. माढा तालुक्यात घरगुती २९५६९, व्यापारी ३४७०, औद्योगिक ८३७ तर कृषी ग्राहक ४३३४९ इतर ४६४ असे एकूण ९७८८० ग्राहक आहेत.
राज्यातील शेतकºयांची कृषीपंपाची थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना जाहीर करूनही त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयांनी याचा लाभ घेतला नसल्याने थकबाकी वाढली असल्याने या कृषी संजीवनी योजनेंतर्गत मूळ असलेली थकबाकी हप्त्याने भरण्याची तरतूद करण्यात आली असून, त्यात ३० हजारांची थकबाकीदार शेतकºयांना प्रत्येक तिमाहीस एक हप्ता अशा पाच हप्त्याची सवलत तर ३० हजारांच्यावर थकबाकीदार असतील तर प्रत्येक दीड महिन्यास एक हप्ता भरण्याची तरतूद आहे. या प्रत्येक हप्त्यासह चालू बिलही भरण्याचे आहे. कृषी संजीवनी योजनेतील कृषीपंप ग्राहकांनी मार्च २०१८ पर्यंत थकबाकी भरून लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता ताडे यांनी केले आहे .