सोलापूर : अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ९३३ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली. यामुळे जिल्ह्यातील बरीच गावे ही ७० टक्के ओलिताखाली आली असून, बागायतीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक गावांची समृद्धी झाली आहे. या योजनेवर जिल्ह्यात ७०६ काेटी रुपये खर्ची झाले आहेत. काेणत्याही गावात ही कामे प्रलंबित राहिली नसल्याने या गावांचा कायापालट व्हायला सुुरुवात झाली आहे.
यंदा उन्हाळ्यात टँकर बंद झाले. गावागावांत पाणी मुरले आहे. ऊस, केळी, डाळिंबाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याही पुढे जाऊन काही गावांनी जलपुनर्भरणाची कामे हाती घेतली आहेत. पुढील ५० वर्षांत या गावांना पाणीटंचाई जाणवणार नाही. काही गावांत नवीन सिमेंट बंधारे बांधायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता विकासकामांनाही गती आली आहे. याचा नकळतपणे अनेक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.
-----
भागाईवाडी
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावात बागायतीबरोबर नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाझर तलाव दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येथील हिरवी मिरची, सिमला मिरची बेंगलोर, पुण्याला जातेय. हाताने पाणी घेता येईल एवढ्या विहिरी भरल्या आहेत. इतर जलसाठ्यांची क्षमता वाढली असून, गावाची समृद्धी झाली आहे.
-----
पाणीपातळी वाढली
नागझरी नदीवर एक कोटी १६ लाखांचा को.प. बंधारा मंजूर झाला आहे. आता ७० टक्के क्षेत्रफळ ओलिताखाली आले आहे.
कविता घोडके-पाटील, सरपंच
-----
जलयुक्त शिवार आणि इतर कामांमुळे भागाईवाडीतील बागायत क्षेत्र ३ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आले आहे. गावातील भाजीपाला पुणे, बेंगलोरला जातोय.
लहू घोडके, कृषिमित्र, भागाईवाडी
---
बऱ्हाणपूर
अक्कलकोट तालुक्याला सातत्याने पाणीप्रश्न भेडसावत होता. तालुक्यात बऱ्हाणपूर गावात नाला खोलीकरण, ओढ्याची कामे झाली. विहिरी पुनर्भरणाचीही कामे झाली आहेत. तत्पूर्वी दोन वर्षे पाण्याचा प्रश्न अधिकच त्रासदायी ठरला. या भागात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यापुढे गावाला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.
जलयुक्त शिवारांतर्गत बऱ्हाणपूरमध्ये ६९६ हेक्टरवर कामे झाली. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत झालेल्या कामांमुळे भूजलपातळी वाढली आहे.
- इमामोद्दीन पिरजादे, उपसरपंच
--
स्वत:ची शेती कोरडवाहू होती. ज्वारी, तूर आदी पिके घेत होतो. शेताजवळ ओढ्याचे खोलीकरण झाल्याने आता सात एकर ऊस लागवड करता आला.
डाॅ. नासीर पिरजादे, गावकरी
---
वांगी
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील पाणीपातळी वाढली. अनेक ठिकाणच्या बंद विहिरींना पाणी आले. उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी गाव हे प्रथम क्रमांकाचे गाव ठरले. ही कामे राबविण्यापूर्वी गावात दोन दिवसांना टँकरने पाणीपुरवठा व्हायचा तो आता पूर्णत: थांबला आहे. गाव समृद्धतेच्या वाटेवार आहे.
---
जलयुक्तमुळे गाव समृद्ध झाले. एक तास चालणारा बोअर आता दोन तास चालतोय. गावात वृक्षलागवड आणि जलपुनर्भरणाची कामे नियोजित आहेत. तेही लवकरच मार्गी लागतील. - सरस्वती भोसले-सरपंच, वांगी
--
समृद्ध ग्राम योजना पुढचे नियोजन आहे. जलयुक्त आणि वॅाटरकप अंतर्गत बक्षिसातून काही रक्कम जमा झाली असून, दहा लाखांचे दुसरे काम मंजूर झाले आहे.
- विलास पाटील, गावकरी