सोलापूर : जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ही भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली असता हे नुकसान सुमारे ९३५ कोटी २८ लाख रुपयांचे असल्याचे सांगण्यात आले आहे. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून, शासनाकडे या मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी दिसत असले तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अभियंता संतोष शेलार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. बी. टी. दुधभाते उपस्थित होते.------------दुसरी लाट सावध राहायुरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातही अशी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भरणे यांनी केले.