५० टक्के थकबाकी भरा, आपलं वीज बिल कोरे करा आणि अवघा महाराष्ट्र समृद्ध करा. महावितरण कंपनीमार्फत कृषिपंपाच्या सप्टेंबर २०२० पर्यंत चालू बिलासह मागील थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलत मिळणार असल्याने कृषिपंपांच्या ग्राहकांडून ५० टक्के थकबाकी भरण्यास प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील ९५ कृषिपंप ग्राहकांनी १६ लाख ३८ हजार थकबाकी भरली आहे, तर शहर व तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी सुमारे ९५ लाख रुपये थकबाकी भरून वीज तोडणीपासून मुक्ती घेतली आहे.
महावितरण कंपनीचे सांगोला तालुक्यात कृषिपंपांच्या ३३ हजार १८९ ग्राहकांकडे सुमारे ४१० कोटी थकबाकी आहे. यामध्ये १० कोटी चालू बिलाची बाकी आहे. शासनाकडून थकबाकी बिलात व्याज विलंब आकार माफ करता शेतकऱ्यांना २७० कोटी थकबाकीत ५० टक्के सवलत मिळणार आहे. कृषिपंप धोरणाची १८ डिसेंबर २०२० पासून अंमलबजावणी चालू झाली असून, ३१ मार्च २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कालावधी असणार आहे. कृषी धोरणानुसार मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के बिल भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के माफ होणार आहे.