करमाळा : केम येथे बेंदबाग तळेकर वस्ती परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ९५ हजार ९४० रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
याप्रकरणी अरूण जनार्दन तळेकर (वय ६५) व कचरे (रा. पिंपळकुंटे, ता. माढा) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार धनाजी देविदास गाडे यांनी फिर्याद दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी करमाळा तालुक्यात केम परिसरात गस्त घालीत होते. दरम्यान बेंदबाग तळेकर वस्तीमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर आणि अक्षय दळवी यांनी सापळा लावून धाड टाकली असता अरूण जनार्दन तळेकर हा घरासमोर गांजा विकत असताना मिळून आला. २७ जुलै रोजी २.४५ वाजता भिंती लगत धान्याचे पोती व रिकामे पोते बाजूला चौकोणी आकाराचा एक पुडा, एक इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिकच्या गोणीमध्ये ८ किलो १५४ ग्रम वजनाचा हा गांजा जप्त केला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, समीर शेख यांनीही सहभाग नोंदवला. अरूण तळेकर याने हा गांजा कचरे नामक व्यक्तीकडून विकत आणल्याचे सांगितले.