- अंबादास वायदंडे
सुस्ते (जि. सोलापूर) : घरची परिस्थिती बेताचीच... त्यामध्ये आईला सारखा सतावणारा आजार. दवाखान्यात जाण्यासाठी वेळेवर वाहन मिळत नसल्यामुळे ९६ वर्षीय आईला चाऱ्याच्या हातगाडीवर बसवून ६५ वर्षांचा आधुनिक श्रावण हा सेवा करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून तो आईची अशाच पद्धतीने सेवा करत आहे.
तळहाताचा पाळणा व नेत्राचा दिवा करून जग दाखवणाऱ्या आई-वडिलाला वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. मात्र, ज्या आई-वडिलांनी आपल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ करून लहानाचे मोठे केले, त्याच आई-वडिलांची वृद्धापकाळात सेवा करण्याचे काम भारत साठे करत आहे.
साठे कुटुंबीय हे पंढरपूर तालुक्यातील सुस्तेपासून जवळपास दोन किमी अंतरावर असलेल्या तरडेवाडी वस्तीवर राहण्यास आहेत. भारत साठे यांच्या आई वैजंता साठे यांना वृद्धापकाळाने सारखे उपचारांसाठी सुस्ते येथील खासगी दवाखान्यामध्ये यावे लागते.