विलास जळकोटकर/ सोलापूर
सोलापूर : दोन महिन्याच्या गरोदर असलेल्या विवाहितेच्या पोटात हृदय नसलेले बाळ पोटात वाढत असल्याच्या निदानानंतर शस्त्रक्रियेद्वारे ते काढण्यात आले. यामुळे मालेला जीवदान मिळाले. पंढरपुरातील सरकारी दवाखान्यात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर मातेला रक्तस्राव होऊ लागल्याने सोमवारी सकाळी १०.३० वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील पूजा तानाजी पवार (वय- २५) या दोन महिन्याच्या गरोदर होत्या. दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी त्यांनी सोनोग्रॉफी करवून घेतली. यामध्ये दोन महिने वाढ झालेल्या बाळाला हृदय नसल्याचे निदान करण्यात आले. मातेच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरातील सरकारी दवाखान्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करवून बाळाला बाहेर काढण्यात आले. यानंतर सदरील मातेला रक्तस्राव होऊन त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी सोलापूरला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सदर रुग्णाला सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधीत मातेवर उपचार सुरु असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.