सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे १२ वर्षाचा मुलगा झोपून उठून अंगणात उभा राहिला. अन् अचानक सापानं त्याच्या पंजावर डंख मारला अन् त्याच्यावर उपचार होण्याअगोदरच काळानं हिरावलं. जणू दिवसाचा सूर्य पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं. राज बिरुदेव सलगर (वय १२) असे या मुलाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे मयत राज हा आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. सोमवारी सकाळी ६:३० च्या सुमारास तो उठला. झोपेतच डोळे चोळत तो घराबाहेरच्या अंगणात आला. येथे साप दबा धरुन बसल्याची त्याला यत्किंचही कल्पना नव्हती. या सापानं त्याच्या पायाच्या पंजावर जोराचा डंख मारला. क्षणातच ही सारी घटना घडली. त्याच्या ओरडण्यानं सारेच जमले.
तातडीने त्याला मोहोळच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मामा आकाश काळे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा वाटेतच उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौीकीत नोंद झाली आहे.