अलीकडील काळामध्ये ऐकावे ते नवलच, अशा घटना सातत्याने घडत आहे. अशी घटना ही अकलूज येथे घडली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र राहण्याची सवयच लागल्यामुळे दोघांनीही आयुष्याचा साथीदार हा एकच निवडला आहे. या तिघांचा विवाह अकलूज येथे पार पडला. गजब कहाणीतून प्रेम निर्माण झाल्यामुळे अजब लग्न पार पडले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आणि जुळ्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडले.
सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल झाला आहे. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
तत्पूर्वी, जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या.
सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ
अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून चर्चा होत मिम्सचा अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याचे सांगितले. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असेही मत मांडले.