साेलापूर : स्मार्ट सिटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना एक खाेका मागणाऱ्या ‘ताईं’चे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची ‘ईडी’कडून चाैकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी रविवारी केली.
स्मार्ट सिटी कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडून शहरातील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने खाेका मागितल्याची चर्चा आहे. या अधिकाऱ्याने मात्र या महिला पदाधिकाऱ्याला नकार देताना आपण असे काेणतेही काम करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या विषयावर ‘लाेकमत’ने ‘लगाव बत्ती’च्या माध्यमातून प्रकाश टाकला हाेता. यावर भाजपचे सभागृह नेता शिवानंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली सरकार आहे. पाेलीस आयुक्त दर्जावरील अधिकाऱ्यांनीच या सरकारच्या मंत्र्यांबद्दल तक्रारी केल्या आहेत. या सरकारमधील मंत्री तुरुंगात आहेत. साेलापुरात तर अधिकारी आणि महाविकास आघाडी पदाधिकारी यांची मिलीभगत आहे. माेदी सरकारने शहराचे रूप बदलण्यासाठी स्मार्ट सिटी याेजना आणली; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी पाठवून या याेजनेचे वाटाेळे करण्याचा प्रयत्न केला.
किरीट सोमय्यामार्फत पाठपुरावा
स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आम्ही केंद्र शासनाकडे तक्रारी केल्या. पण आमच्याकडून अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार झाला नाही; परंतु आघाडी सरकारमधील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने विशिष्ट पद मिळवून देताे म्हणून अधिकाऱ्याकडून एक काेटी रुपये मागण्याची चर्चा आमच्याही कानावर आली आहे. या प्रकरणाची ईडीकडून चाैकशी करणे आवश्यक आहे. आम्ही लवकरच यासंदर्भात किरीट साेमय्या यांच्यामार्फत पाठपुरावा करणार आहाेत.