सोलापूर : उत्तर तहसील कार्यालयातील लिपिक १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. अतुल अशोक रणसुबे असे त्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती. पण, सातबारा उताऱ्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन, यात तफावत होती. त्याबद्दल तक्रारदाराने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या अर्जाची कोणीच दखल घेत नव्हते. दरम्यान, ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक रणसुबे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
गुरुवारी लाचेची रक्कम रणसुबे याने तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्विकारली. पण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर लक्ष ठेवून होते. पैसे हातात घेतले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.