सोलापूर: बांधकामावर सेन्ट्रींगचे काम करताना अंगावर भिंत कोसळून कामगाराचा मंगळवारी सायंकाळी उपचारापूर्वी मृत्यू झाला. मंगळवारी (३० मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुळेगाव येथील दामले वस्ती येथे ही घटना घडली. हसन बाबू शेख (वय- ३५, रा. वळसंग, ता. द. सोलापूर) असे मयत कामगाराचे नाव आहे.
यातील बांधकाम कामगार हा वळसंग गावचा असून, मुळेगाव येथील दामले वस्तीवर सेंट्रीगचे काम करत होता. मंगळवारी सकाळी अचानक त्याच्या अंगावर भिंत कोसळली. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. डोक्यासह शरीर रक्तबंबाळ झाले. कमरेला मुका मार लागला. त्याला तातडीने शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर भाऊ हुसेन शेख याने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.