सोलापूर : मतदानासाठी घराबाहेर गेलेल्या तळेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने भरदिवसा रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना भोसे येथे दि. ७ रोजी घडली. याबाबत स्वप्निल सुनील तळेकर यांनी करकंब पोलिसांत फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेकर कुटुंबातील सदस्य दि. ७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून मतदानाला गेले होते. यावेळी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसून आले. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता हॉलमध्ये सोन्याच्या दागिन्याची रिकामी बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडले होते.
कपाटामधील ड्राॅवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम एक लाख रुपये रकमेसह सोने-चांदीचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.