सोलापूर : पैशाच्या कारणावरून कुंभारी (ता.द.सोलापूर) गावात शेतकऱ्याच्या पायावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एकाविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात रविवारी सकाळपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत पेालिसांनी सांगितले की, फिर्यादी मलकारी मुतकन्ना भांडे (वय ४७, रा. कुंभारी, ता.द.सोलापूर) हे गावातील चंद्रशेखर चांगले यांच्या दुकानात झेंडू बाम आणण्याकरिता गेले होते. याचवेळी शिवानंद चंदपा शिंदीबंदी (वय ४०) हा तेथे ऊस तोडण्यासाठी लागणारा कोयता घेऊन आला होता. शिवानंद याने फिर्यादी मलकारी यास तुला किती वेळा पैसे सांगितले तू मला पैसे का दिले नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून ऊस तोडण्याच्या कोयत्याने दोन्ही पायाच्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताच्या पंजावर, कपाळावर मारून गंभीर जखमी केले. या घटनेवेळी अनेकांनी भांडण सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. भांडणावेळी दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सध्या फिर्यादी मलकारी भांडे याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद वळसंग पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.