सोलापूर : परांडा तालुक्यातील सोनारी येथील भैरोबा देवाचे दर्शन उरकून बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील शेकरी भक्तगणाची दुचाकी पांढरे पट्टे नसलेल्या गतिरोधकवर जम्प होऊन घसरली. या अपघातात कोंडीबा सूर्यभान भोसले (वय ६५, रा.शेंद्री, ता. बार्शी) हे शेतकरी गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मरण पावले तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
हा अपघात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरोबाचे देवस्थान असून मे महिन्यातील यात्रेस गर्दी असते. देवाच्या दर्शनासाठी कोंडिबा भोसले व मोटरसायकलस्वार अर्जुन पोकळे हे (एम.एच.१३/ ए.टी.१४०५) या दुचाकीवरुन निघाले होते. दर्शन आटोपून शेंद्रीकडे परांडा मार्गे येत असताना पांढरे पट्टे नसलेल्या गतिरोधकावरुन दुचाकी जम्प मारून घसरली. मागे बसलेले भोसले हे रस्त्यावर पडून डोक्याला जबर मार बसून रक्तबंबाळ झाले.
जखमी अर्जुन पोकळे यांनी लोकांच्या मदतीने परांडा येथील रुग्णालयात भोसले यांना उपचारास आणले. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. परांडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.