सोलापूर : निकृष्ट अन्न प्रकरणी सोलापूर रेल्वे स्टेशनवरील जनआहार केंद्राला पन्नास हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच स्टेशनवरील स्वच्छतागृहात अस्वच्छता आढळल्यामुळे दहा हजारांचा दंड करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर ॲमेनिटी कमिटीच्या सदस्यांनी २६ ते २८ मार्च दरम्यान सोलापूर विभागाची पाहणी केली.कमिटीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके, रवी चंद्रन, कैलास वर्मा यांनी सोलापूर विभागाची तपासणी केली. यावेळी त्यांनी जनआहार केंद्रातील अन्न खाल्ले. यावेळी त्यांना बटाट्याची भाजी खराब दिसली. यामुळे डॉ. फडके यांनी जागीच केंद्र चालकाला झापले. त्यासोबत रेल्वे अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले. त्यानंतर सदस्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली. स्वच्छतागृहात देखील अस्वच्छता होती.
स्वच्छतागृह चालकावर देखील कारवाईचे आदेश दिले. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृह चालकाला केवळ दहा हजारांचा दंड केला आहे. जनआहार केंद्र तसेच स्वच्छतागृह चालकाचा परवाना रद्द करण्याची सूचना सदस्यांनी केली. रेल्वे प्रशासनाने परवाना रद्द न करता दंडात्मक कारवाई केली आहे.