सोलापूर : तुळजापूर रोडवरील भोगाव हद्दीत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान, १६ तासानंतरही आगीची तीव्रता कमी होईना. आगीचे रौद्र रूप अन् लोळ दहा किलोमीटर अंतरावर दिसत असल्याने त्याची तीव्रता मोठी आहे. ती आटोक्यात येण्यासाठी अंदाजे दहा ते पंधरा दिवस तरी लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे सोलापूर-तुळजापूर रोडवरील भोगांव हद्दीत कचरा डेपो आहे. साधारण: ४० ते ५० एकरात महापालिकेचा कचरा डेपो आहे. शहरातील सर्व कचरा घंटागाडीतून गोळा करून कचरा डेपोजवळ साठविला जातो. दररोज ७०० ते ८०० टन कचरा संकलन होते. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळावर दाखल आहेत. आग विझविण्याचे काम वेगाने सुरू आहे. खासगी टँकर चालकांचीही मदत घेतली जात आहे. आग जास्त प्रमाणात विखुरल्यामुळे विझविण्यासाठी अडचण येत आहे.
आग मोठी आहे, आतापर्यंत १० ते १२ गाड्यांमधून पाणी मारले आहे, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. मागे अशीच एकदा या कचरा डेपोला आग लागली होती तशीच आग पुन्हा लागली आहे. आम्ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.