साेलापूर : कलादृष्टी आर्ट फाउंडेशन आणि एस.एस. गणपतराव महाराज काॅलेज (बीएफए) च्या माध्यमातून गुरुवार १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत निर्मलकुमार फडकुले सभागृहात भव्य चित्र आणि शिल्प प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शहरातील नामवंत कलाकारांची चित्रे, शिल्पे पाहायला मिळतील, अशी माहिती बीएफए काॅलेजचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निर्मलकुमार फडकुले सभागृहात १ फेब्रुवारी राेजी सायंकाळी पाच वाजता पाेलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डाॅ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन हाेईल. यावेळी आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे, कला महाविद्यालय संघाचे अध्यक्ष महेश थाेरात, उद्याेगपती किशाेर चंडक, काॅलेजचे सचिव डाॅ. अजय निनावे, प्राचार्य देविदास मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. २ फेब्रुवारी राेजी सायंकाळी पाच वाजता देविदास मेटकरी यांचे शिल्प प्रात्यक्षिक तर चित्रकार सचिन खरात यांचे चित्र प्रात्यक्षिक हाेईल. ३ फेब्रुवारी राेजी बार्शीचे चित्रकार व शिल्पकार राजा फफाळ यांचे शिल्प प्रात्यक्षिक हाेईल. ४ फेब्रुवारी राेजी सायंकाळी पाच वाजता काेल्हापूरचे चित्रकार दिलीप दुधाने यांचे चित्र प्रात्यक्षिक हाेईल. ४ फेब्रुवारी राेजी सायंकाळी सहा वाजता या प्रदर्शनाचा समाराेप हाेईल. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे आणि पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठातील पुरातत्व विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.