सोलापूर: चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एका विहिरीत कोल्हा पडला होता. तिथेच असलेल्या दगडाचा आधार घेत कोल्ह्याने चार दिवस काढले. वन विभागाने जाळीच्या साह्याने त्याला बाहेर काढले. पाण्याच्या शोधात असलेला पाच वर्षाचा कोल्हा चपळगाव येथील एका ५० फूट खोल असलेल्या विहिरीत पडला. चार दिवस तो तिथेच होता. तिथले शेतकरी बसवराज वाले यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वन विभागाचे पथक रॅपलिंग किट, जाळी व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले. प्रविण जेऊरे व गणेश निरवणे हे रॅपलिंग किटच्या साह्याने विहीरीत उतरले. सुरक्षित अंतर ठेवत त्यांनी कोल्ह्याला जाळीत बंदिस्त केले. ही जाळी विहीरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आली. यासाठी दोन तासांचा वेळ लागला.
विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडले. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शंकर कुताटे, रुकेश कांबळे, वनरक्षक रमेश कुंभार, वनसेवक सिद्धाराम सुतार, प्रवीण जेऊरे, गणेश निरवणे यांनी ही मोहीम यशस्वी केली.