सोलापूर : पुण्याहून सोलापूरकडे येणारी ४० डब्यांची मालवाहतूक गाडी दौंड जवळ रुळावरून खाली घसरली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पथकाची नियुक्ती केल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
मालवाहतूक गाडी रुळावरून कशी घसरली? त्यामागील कारणांचा शोध संयुक्त पथक घेणार आहे. याप्रकरणी रेल्वेचे किती नुकसान झाले?, किती गाड्यांचे टाईमटेबल बिघडले?, प्रवासांना झालेला त्रास आदी प्रकरणाची चौकशी संयुक्त पथक करणार आहे. सात दिवसाच्या आत चौकशी पथक अहवाल सादर करणार असल्यामुळे या प्रकरणातून रेल्वेचे किती नुकसान झाले, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
या गाडीचा मधला डबा रुळावरून घसरल्यामुळे ट्रेन चालकाने गाडी लगेच थांबवली. गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे ही गाडी जमिनीवर पलटी झाली नाही. रात्री साडेनऊनंतर गाडी रुळावर आली. विशेष म्हणजे ही मालवाहतूक गाडी रिकामी होती. घसरलेली मालवाहतूक गाडी दौंड जवळ अडीच ते तीन तास थांबून राहिली. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील सर्व गाड्या ब्लॉक झाल्या. ही घटना सायंकाळी सोमवारी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दौंड येथील ए केबल लाईनवर घडली.