सोलापूर : यापूर्वी येऊन गेलेला हृदयविकाराचा धक्का, त्यानंतर झालेली अँजिओप्लास्टी, त्यात हृदयाच्या दोन महत्त्वाच्या कप्प्यांमधील पडद्याला मोठे छिद्र पडले अशा वाईट स्थितीत रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या रुग्णाचे प्राण वाचविण्यास डॉक्टरांना यश आले.
रुग्णाचे वय ५३ वर्षे. त्याच्यावर दुसऱ्या एका शहरात एमर्जन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्याची नाडी व्यवस्थित लागत नव्हती, रक्तदाब कमी झाला होता, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. तसेच हृदयामध्ये जीवघेणी गुंतागुंत झाली असताना तो रुग्ण अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल झाला. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज पडली होती. या प्रकारच्या रुग्णावर वेळेवर शस्त्रक्रिया करून छिद्र बंद केले तरच प्राण वाचण्याची शक्यता असते.
रुग्णाच्या अशा परिस्थितीत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून रुग्णाचा जीव वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेद्वारे एक छोटी चकती बसवून छिद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. जांघेतील आणि मानेतील एव्ही लूप तयार करून ही चकती छिद्राच्या दोन्ही बाजूला बसवून तेथील रक्तप्रवाह बंद करण्यात आला.
एक महिन्यापूर्वी ही शस्त्रक्रिया हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी केली होती. शस्त्रक्रियेच्या नंतर १५ दिवस रुग्ण अत्यावस्थ होता. मागील आठवड्यापासून रुग्णाची तब्बेत सुधारत असून तो आता चालू-फिरू शकत आहे.
अशी शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी
या पद्धतीची शस्त्रक्रिया देशभरात फार कमी प्रमाणात होते. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. संतोष कलशेट्टी व त्यांची सहकारी, कॅथलॅब व सीसीयू कर्मचारी यांची मदत झाली. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल, व्हाइस चेअरमन डॉ. विजय पाटील यांनी डॉ. गुरुनाथ परळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.