सोलापूर : वर्षातून चार मोठया वाऱ्या होतात. प्रत्येक वारीला ६५ एकर मध्ये दिंडी वेगवेगळी असते. प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भविकांना मंडप सापडणे, दिंडी मिळणे कठीण होत आहे. दरम्यान, या तोडगा काढण्यासाठी पंढरपुरातील ६५ एकरामधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायमस्वरुपी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे-महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आदी उपस्थित होते. प्रत्येक प्लॉट सिमेंट काँक्रिट करण्यात यावा, प्रत्येक प्लॉटवर पत्राशेड उभारावेत, आणखी १०० एकर जागा वारीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, ६५ एकरात वारी कालावधीत स्वतंत्र पोलिस चौकी असावी, ६५ एकरामध्ये स्वच्छ व फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, परिसर स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष असावा, वारी कालावधीत इतर कोणालाही जागा देऊ नये अशाही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.