सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे. बुधवारी आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील रतिकांत पाटील या व्यक्तीची जिवंत प्रेतयात्रा काढली. या अनोख्या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता.
दरम्यान, बुधवारी सकाळी देगांव ग्रामस्थांनी सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक बंद केली होती. उत्तर तालुक्यातील कोंडी गावात आज सकाळपासून गावात चूल बंद..गाव बंद आंदोलन करण्यात येत आहे. याशिवाय मार्डी, वडाळा, नान्नज, कारंबा, गुळवंची, बीबीदारफळ गावात विविध आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळपासून एसटी सेवाही बंद आहे. सोलापूर आगारातून एकही एसटी बस बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हयासह संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा, एस.टी. बसेस, खाजगी बसेस यावर मोठा परिणाम झाला आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण होत आहे.