सोलापूर : पावसाळ्याच्या मध्यावर दोन महिन्यांनंतर थोडासा पाऊस पडला. त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या नंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके जवळपास गेल्यात जमा आहेत. आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. त्यात पाऊसही पडेना म्हणून वैतागून राळेरास (ता. बार्शी) येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला.
पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने खरीप हंगामातील ही पिके पावसाअभावी जवळपास वाया गेली आहेत. सध्याचा काळ हा फुले लागण्याचा काळ असून या काळातच जर पाऊस नसेल तर हिरव दिसत असलेले व सुकलेले पण त्याला शेंगा येऊ न शकणारे सोयाबीन शेतात ठेवण्यात काय अर्थ. पुढे पाऊस पडला तर रब्बी हंगामात काही तरी करता येईल, यामुळे वैतागून बार्शी तालुक्यातील शेतकरी संतोष शेरखाने यांनी दोन एकर, बालाजी ढवळे यांनी तीन एकर तर गणेश प्रतापराव पाटील यांनी दोन एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून निसर्ग व शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे.