सोलापूर : सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील चंदनाच्या झाडासोबत कडूलिंब, फुलांची आदी झाडे तोडण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ही घटना कळाल्यानंतर मनपाचे उद्यान अधीक्षक रोहित माने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. याबाबत चौकशी करून अहवाल पाठवला जाणार आहे.
शनिवारी दुपारी विश्रामगृहाच्या परिसरातील स्वछतागृहाच्या बाजूची ५ झाडे तोडण्यात आले होते. यात एक मोठे चंदानाचे झाड ही होते. तोडण्यात आलेल्या झाडाचा खोडा वरून दिसत होता. शिवाय ही माहिती मिळताच मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांनाही विश्रामगृहाच्या परिसरात पालापाचोळा पडल्याचे दिसून आले. यामुळे या घटनेची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दुपारी माहिती कळताच आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी तेथील एक चंदनाचे झाड छाटलेले आम्हाला आढळले. यामुळे परिसराची पाहणी ही आम्ही केली. याबाबत चौकशी करून याचा आहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. शिवाय वृक्ष तोड कोणाच्या सांगण्यावरून झाले? याचा काय हेतू होता? कोणी तोडले? याची माहिती घेतली जाणार आहे.
-रोहित माने, उद्यान अधीक्षक, मनपा
चंदनाच्या झाडाचा मधला भाग गेला कुठे ?
झाडे तोडल्यानंतर त्यांचा पालापाचोळा जवळच्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकण्यात आले होते. शिवाय काही झाडे तोडून तेथेच टाकून देण्यात आले होते. पण चंदनाचे झाड तोडल्यानंतर त्याचा मुख्य भाग मात्र कोणालाच दिसला नाही. यामुळे याचा शोध अधिकारी घेत होते. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याच्या घरासमोरील झाड ही तोडण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.