विठ्ठल खेळगी
सोलापूर : पिकांवर ड्रोन मशीनद्वारे फवारणी करण्याची संकल्पना आता पुढे आली आहे. वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी औरादच्या शेतकऱ्यांनी या नवीन टेक्नॉलॉजीच्या आधार घेतला आहे. आपल्या उसावर औषध फवारणीसाठी सांगलीहून ड्रोनची मशीन मागविली आहे. एका एकरावर मजुरांच्या साहाय्याने औषध फवारणीसाठी साधारण तीन तास लागतात. मात्र, ड्रोनद्वारे फवारणीसाठी केवळ आठ मिनिटे लागतात. त्यामुळे एका तासात सहा ते सात एकर पिकांवर फवारणी करण्यात येत आहे.
शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. ऊस कापण्यासाठी मशीन आली. सोयाबीन, तूर, उडदाची रासही झटक्यात होऊ लागली. त्याशिवाय पिकांवर फवारणी करण्यासाठी पाठीवर पंप आले. त्या पंपांना बॅटरी बसविण्यात आली. त्यामुळे मजुरांना होणारा त्रास वाचला. आता त्यातही क्रांती झाली आहे. थेट ड्रोनद्वारे फवारणी करण्याची संकल्पना पुढे आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील शेतकरी सुभाष वाले यांच्या शेतातील ऊसावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली.
सांगलीहून ड्रोन मागविण्यात आली. त्या ड्रोनला एकूण सहा पाने असून त्यालाच पंखेही बसविण्यात आले आहेत. मशीनच्या खाली १० लिटरची एक टँक आहे व त्याला बॅटरी बसविण्यात आलेली आहे. एकदा बॅटरी चार्ज करून लावल्यानंतर सुमारे तीन तास फवारणी करण्यात येते. ड्रोन उडविण्यासाठी रिमोट असून त्या रिमोटच्या साहाय्याने पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येते.
.....................
मजुराद्वारे एकराला २०० लिटर तर ड्रोन मशीनद्वारे दहाच लिटर
मजुराद्वारे एका एकरावर औषध फवारणीसाठी साधारण २०० लिटर लागतात. त्यासाठी साधारण २० लिटर औषध लागतो. ड्रोनद्वारे १० लिटरमध्ये एक एकर पिकांवर फवारणी होत आहे. त्यात नऊ लिटर पाणी व एक लिटर औषध मिसळून फवारणी करण्यात येते. औषध कमी लागत असल्याने पैशाची बचत होत आहे. शिवाय मजुरांवरील खर्चही कमी होत आहे, असे शेतकरी सुभाष वाले यांनी सांगितले.
..............
शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणाचा वापर करून शेती केल्यास फायदा होणार आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात खर्च येते. शेतकऱ्यांना परवडत नाही. आता ड्राेनद्वारे फवारणी करण्यासाठी कमी खर्च लागतो. त्याशिवाय शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचाही लाभ घेऊन शेती करावी.
-बाशू राठोड, कृषी सहायक, औराद