विलास जळकोटकर
सोलापूर : आश्रमशाळेतील शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी चक्क शिपायानं पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा लावून समाजकल्याण विभागातील शिपायास ताब्यात घेतले. दुसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. अशोक जाधव (बसवनगर, मंद्रूप) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची पत्नी समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदर शिक्षिकेचा पगार अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तो काढण्यासाठी वारंवार त्यांचा पाठपुरावा होता. यावर समाजकल्याण विभागात सेवक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक जाधव याने पाच लाखांच्या रकमेची मागणी केली.
यावर शिक्षकेच्या पतीने लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. त्यांनी लाच मागितल्याची शहानिशा केली असता त्यामध्ये तत्थ्य असल्याचे लक्षात आले. पथकाने सापळा लावून अशोक जाधव या सेवकाला ताब्यात घेतले. तर टेंभुर्णीच्या जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाोचा किसन भोसले-पाटील हा पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर?
शिपाई पाच लाख एवढी मोठी रक्कम कशी मागू शकतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामागे मोठी हस्ती असावी, अशी चर्चा समाजकल्याण कार्यालयाच्या परिसरात सुरु होती. दरम्यान, याची खबर मिळताच सेवक असलेला दुसरा पळून गेला. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला आरोपी अशोक जाधव हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.