सोलापूर : कृषि पणन मंडळामार्फत २०२२-२३ यावर्षीच्या हंगामात राज्यातील ६१ बाजार समित्यांनी ३ हजार २६९ शेतकऱ्यांचा १ लाख ४७ हजार २९३ क्विंटल शेतमाल तारणात स्विकारुन त्यांना एकूण ३९ कोटी ९८ लाख इतक्या रकमेचे तारण कर्ज वितरीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने लोकमत शी बाेलताना दिली आहे.
उतरत्या बाजारभावामुळे शेतमालाचे काढणी हंगामात होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत ६ टक्के व्याजदराने ६ महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध करुन दिले जाते. बाजार समित्या व शेतकऱ्यांकडून योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून शेतमाल तारण कर्ज योजना ही राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे कृषी विभागाने दिली आहे.