सोलापूर : मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, सिध्देश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा देण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोलापूर विभागातून धावणारी सिध्देश्वर एक्सप्रेसला माढा, जेऊर, केम या ठिकाणी गाडीचा थांबा सुरू झालेला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा व निषेधार्थ आहे तसेच या निर्णयाबाबत रेल्वे प्रशासनाने मागणीचा विचार विनिमय करण्यासाठी मोहोळ रेल्वे स्थानकावर निषेध आंदोलन करण्यात आल्याचे रमेश बारसकर यांनी सांगितले. यावेळी मोहोळ येथील शेकडो नागरिक व प्रवासी मोठया संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोहमार्ग पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.