पंढरपूर : पांडुरंगाच्या नगरीत आलेल्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुठे कमी पडणार नाही. एक हजार बेडचे रुग्णालय पंढरपुरात सुरू करणार आहे. तसेच रांगेत थांबणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप व टोकन दर्शनासाठी निधी देण्यात येईल. विकास करताना कुणाला नाराज केले जाणार नाही. सर्वांना विचारात घेऊनच विकास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे (वय ५५) व आशाबाई बाळू आहिरे (५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन समितीचे सहअध्यक्ष गहणीनाथ महाराज औसेकर,
भरतशेट गोगावले, आमदार समाधान आवताडे, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ॲड. कीर्तिपाल सर्वगोड आदी उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांचं भलं कर’ विठ्ठलाला साकडे..
“वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे. देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे.” याव्यतिरिक्त आपण देवाला काही मागत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ही पांडुरंगाचीच कृपा
nमुख्यमंत्री म्हणाले, “वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला, ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या यंदा ३० टक्के वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करीत आहे.
nआरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिघे पंढरपूर येथे मुक्कामी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.