सोलापूर : खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दुचाकी चोऱ्या करुन फरार असलेल्या आरोपीला खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार मोहोळच्या स्टँडवर सापळा लावून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि ७० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तपासात त्याने बारा गुन्ह्याची कबुली दिली. अल्या उर्फ आल्या सुरेश काळे (वय- २१) असे आरोपीचे नाव आहे.
बरुर (ता. द. सोलापूर) येथील साहेबलाल शेख यांचे घर फोडून चोरट्याने सोने, चांदीचे दागिने चोरुन ८ लाख ५५ हजार रुपयांची चोरी केल्याबद्दल मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला होता. पोलीस अधिक्षक शिरीश सरदेशपांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि शशिकांत शेळके व त्यांच्या पथक पथक मोहोळ शहरात असताना, त्यांना खबऱ्याकडून फरार आरोपी मोहोळच्या स्टँड परिसरात असल्याचे समजले.
सापळा लावून पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बरूर येथील घरफोडी संदर्भात विचारपूस करता त्याने हा गुन्हा साथिदारांसह केल्याचे सांगितले. याशिवाय औराद, कंदलगांव, गुंजेगांव, भंडारकवठे, टाकळी, आटपाडी सांगली आदी ठिकाणी घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरी केल्याचे तो सांगत आहे. त्याच्याकडून बरूर येथील घरफोडीतील रक्क़मेपैकी ७० हजाराची रोकड जप्त केली. त्याला मंद्रुप पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने 3१ जुलैपर्यंत त्याला पोलसी कोठडी सुनावली होती.आणखी गुन्हे उघड होणारसदरच्या आरोपीने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे, अक्कलकोट दक्षिण कडील तीन गुन्हयात, मोहोळ पोलीस ठाणेकडील सहा गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी आहे. त्याचा तपास चालु असून , त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.