सोलापूर : दिव्यांग दिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी दरवर्षी होणारा दिव्यांग क्रीडा महोत्सव यंदा पुढे ढकलला गेला आहे. यंदा २२ व २३ डिसेंबरला क्रीडा महोत्सव होणार आहे. नियोजनासाठी वेळ कमी असल्यामुळे यंदा महोत्सव वीस दिवस पुढे ढकलल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात एकूण ५१ दिव्यांग शाळा आहेत. यात २ हजार २४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पन्नास मीटर धावणे, शंभर मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, तीन चाकी सायकल स्पर्धा या क्रीडा प्रकारात दिव्यांग विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. दिव्यांग दिनीच स्पर्धा होणे अपेक्षित होते. इतर वेळेला क्रीडा महोत्सव झाल्यास त्याचे विशेष महत्व राहणार नाही, असे मत दृष्टीबाधित ब्रेल सार्वजनिक वाचनालयाचे प्रकल्प संचालक प्रभाकर कदम यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपला पदभार घेतला आहे. त्यामुळे महोत्सवाच्या नियोजनासाठी वेळ कमी पडला.