राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सोलापुरातील कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनव्दारे हार घालून जंगी स्वागत केले. चौका-चौकात गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील तीन आमदार अजितदादांच्या बाजूने तर संघटनेतील पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर एका आयटी प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी सोलापुरात आगमन झाले.पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी होटगी रोड विमानतळ ते सात रस्ता ते सलगर वस्ती या कमानी, स्वागताचे फलक, चौकाचौकात गर्दी जमवून स्वागत केले. आसरा चौक, सात रस्ता, माेदी पोलीस चौकी, सेटलमेंट परिसर या भागात जेसीबीतून गुलाबाची फुले उधळून पवारांचे स्वागत करण्यात आले. पवार गट युवक अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी क्रेनव्दारे हार घालून स्वागत केले. सलगर वस्ती येथील भूमीपूजन कार्यक्रमानंतर पवार सांगोल्यात दाखल झाले.
जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन
By राकेश कदम | Published: August 13, 2023 2:37 PM