आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वार सोमवार..वेळ साडेबारा वाजण्याची..वर्हाडी जमलेले..मांडव सजलेला..नववधुवर स्टेजवर आले..अक्षताची वेळ झाली..अक्षता डोक्यावर पडण्यापूर्वी नववधूवरांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला अन् आर्शिर्वाद घेतला. त्यानंतर मंगलाष्टका झाल्या अन् लग्नाच्या बोहल्यावर चढल्याची घटना घडली आहे सोलापुरातील एका मंगल कार्यालयात.
अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथील रहिवासी हणमंत बिराजदार यांचे चिरंजीव संगमेश्वर यांचा विवाह दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील श्रद्धा अरविंद तुळशेट्टी यांच्याशी सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील कंबर तलावाजवळ असलेल्या जगदीश मंगल कार्यालयात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या आधी वधूवराने प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय श्रीराम, सियावर प्रभू रामचंद्र की जय, एकच जयघोष केला. विवाह सोहळ्याच्या आधी विवाह मंडपमध्ये जय श्रीरामचा नारा दिला.
संगमेश्वर हे सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये चित्रकला शिक्षक आहेत तर श्रद्धा ही पुण्यातील एका कंपनीत जॉब करते. श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत असतानाच हा विवाह सोहळा होत होता. शहरात सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष सुरू असताना विवाह सोहळ्यातही जय श्रीरामाचा जयजयकार पहावयास मिळाला. या अनोख्या विवाह सोहळ्याची दिवसभर सोलापुरात चर्चा होत होती.