सोलापूर : बार्शी मुख्य बाजारपेठेतील एका सराफ दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका दांपत्याने दागिने पाहत असताना नोकरास बोलण्यात गुंतवून ९ ग्रॅम सोन्याचे ६० हजारांचे टॉप्स चोरून नेल्याची घटना बार्शी शहरात घडली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सराफ व्यापारी तन्मय रवींद्र बुडूख (वय ३५, रा. सुभाष नगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ग्राहक बनून आलेल्या एक महिला आणि पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे किराणा बाजारपेठेत सराफी दुकान असून या दिवशी भर दुपारी सोने खरेदीस अनोळखी एका पुरुषासोबत महिला आली. महिलेने कानातील टॉप्स मागितले असता मारुती जाधव व सलमान शेख कामगारांनी ट्रे मधून दाखवू लागले. अनोळखी व्यक्तीने त्यातील दागिने हातात घेतले आणि महिलेने माझ्याजवळ सध्या २० हजार रुपये आहेत, उद्या सोन्याची अंगठी मोडून टॉप्स घेऊन जाते म्हणून दोघेही दुकानातून निघून गेले. कामगारांनी ट्रेमध्ये ठेवलेले दागिने मोजून पाहत असताना त्यातील टॉप्सची एक जोड कमी दिसताच त्याचा शोध घेताना दिसला नाही. या घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीत त्या दोघांनी टॉप्स घेतल्याचे दिसून आले. दुकानाबाहेर डोकावले असता दिसले नाहीत. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पायघन करीत आहेत.