सोलापूर : तुमच्या घरावर करणी केली आहे, मुलाच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल, असे म्हणत महिलेची ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली. यासंदर्भात शारदा बाबुराव कोष्टी ( वय ५०, रा. सिध्दरामेश्वर वस्ती, विनायक नगर) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कोष्टी या इंडीवरून येताना त्यांना तेथे रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी इसमाची भेट झाली. त्यावेळी कोष्टी यांनी आपल्या मुलाचे लग्नाबाबत सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादींना मोबाईल नंबर दिला. त्यानंतर तो २८ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येऊन तुमच्या घरातील कोणीतरी करणी केली आहे, पूजा करावी लागेल म्हणत पूजेची मांडणी करत रोख पंधरा हजार रुपये एका ब्लाऊजपीस मध्ये बांधण्यास सांगितले. त्यानंतर ती रक्कम घेऊन तो गेला.
थोड्या दिवसानंतर येऊन आणखीन मोठी पूजा करावी लागेल असे म्हणत नव्या सहा साड्या खरेदी केल्या. शिवाय पूजेला बसल्यानंतर सोने ठेवावे लागेल असे सांगितले. यामुळे फिर्यादींनी गळ्यातील सोन्याचे गंठण पूजेसाठी दिले. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर बंद लागला. यामुळे आपली ६० हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई रजपूत करत आहेत.